सोलापुरात आज (गुरुवार) एकाच दिवशी करोनाचे दहा रूग्ण आढळले आहेत. ४२ संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात दहा जणांना करोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

गेल्या रविवारी तेलंगी पाच्छा पेठ या दाट लोकवस्तीच्या भागातील बसवण्णा चौक परिसरातील एका मृत व्यापाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तत्पूर्वी, मृत व्यक्तीला सुरूवातीला ज्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील एका महिला कर्मचा-यालाही करोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर दोन्ही करोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १६९ रूग्णांची वैद्यकीय चाचणी केली असता त्यांपैकी १६६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यात दहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. यात मृत व्यापाऱ्याच्या संबंधातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अन्य नऊ व्यक्ती त्याच भागातील म्हणजे तेलंगी पाच्छा पेठेतील राहणारे आहेत.

करोनाबाधित महिलेच्या घरात राहतात वीसजण

दहापैकी एक रूग्ण मृत व्यक्तीच्या तर अन्य सर्व नऊ व्यक्ती खासगी रूग्णालयातील करोनाबाधित महिला कर्यचा-याच्या संबंधातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे करोनाबाधित महिलेच्या वाडावजा घरात वीसजण राहतात.