लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णवाढीचे सत्र कायम असून, आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ६९ वर पोहोचली. बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ४८ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील ३८ अहवाल नकारात्मक, तर १० जणांचे अहवाल करोना सकारात्मक आले आहेत.

सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये महिला व पुरुष प्रत्येकी पाच आहेत. मलकापूर तालुक्यात आणखी पाच रुग्णांची भर पडली. मलकापूर येथील चार व तालुक्यातील धरणगांव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय मोताळा तालुक्यातील शेलापूर खुर्द येथील दोन, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, नांदुरा व खामगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मलकापूर येथील बाधित रुग्णांचे वय २९, २१, ४५ वर्षीय दोन व एक ७२ वर्षीय वृद्ध आहे. तसेच शेलापूर येथील रुग्णांमध्ये २६ व तीन वर्षीय रुग्ण, साखरखेर्डा येथील बाधित रुग्ण ५५, नांदुरा येथील ४५ वर्षीय महिला व खामगाव येथील ३१ वर्षीय पुरुष रुग्ण आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ३३ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात ३३ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी १२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण १२७४ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.