दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने गावातील तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून चार दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या मुलीचा मंगळवारी अंबाजोगाईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत मुलीच्या संतप्त नातेवाइकांनी आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे मामाच्या गावी राहणारी ही मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून तिला गावातीलच एक मुलगा सातत्याने त्रास देत होता. ही बाब मुलीने मामाला सांगितल्यानंतर मामाने गावात बठक बोलावून त्रास देणारा तरुण आणि त्याच्या आई-वडिलांना समजावून सांगितले होते. मात्र त्यानंतरही मुलीला त्रास सुरूच होता.

२५ जुल रोजी अशोक रामदास केदार या तरुणाने शाळेत येऊन मुलीची छेड काढली. आपली बदनामी झाली आणि छेडछाडीचा त्रासही होत असल्यामुळे मुलीने मामाच्या शेतातील घरी विष प्राशन केले. उपचारासाठी तिला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मामांनी तक्रार दिल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने नातेवाइकांनी ठाण्यातच ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या आई आणि भावाला ताब्यात घेतले. आरोपी अशोक केदार हा फरार आहे.