यंदा पावसाचीही सरासरी; तूर लागवडीचे क्षेत्र दुप्पट, मुसळधार पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव ओसरला

पालघर : पालघर जिल्ह्य़ात भात, नागली, वरई, तूर आणि इतर तेलबियांची पेरणी आणि फेरलागवड करण्यात आली. ही लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक प्रमाणात झाली आहे. यंदाच्या हंगामात पावसानेही सरासरी गाठल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

यंदा खरीप हंगामात भाताच्या फेरलागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सरासरी लागवड क्षेत्राहून यंदा १०५ टक्के लागवड झाली आहे. याशिवाय तूर लागवडीचे क्षेत्र दुप्पट झाले आहे. नागलीची पेरणी १०३ टक्के झाली आहे. यंदाच्या हंगामात मात्र वरई (८३ टक्के), इतर कडधान्य (४६ टक्के) आणि तेलबिया (७६ टक्के) यांच्या लागवड क्षेत्रात यंदा घट झाली आहे.

गेल्या पंधरवडय़ापासून भातपिकावर डहाणू तालुक्यातील काही भागांत आणि काही इतर ठिकाणी खोडकिडेचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भातावरील रोग कमी झाल्याचे शेती विभागाचे म्हणणे आहे.

सध्या जिल्ह्य़ातील १८० कृषी साहाय्यक यांच्याकडून क्रॉपएसएपी या ऑनलाइन प्रणालीद्वारे भातपिकाचे सर्वेक्षण सुरू आहे. आजवर जिल्ह्य़ातील विविध भागांतील पाच हजारांहून अधिक भातशेतीचे प्रत्यक्षस्थळ छायाचित्र आणि निरीक्षणे या सॉफ्टवेअरमध्ये ‘अपलोड’ करण्यात आले आहेत. या पद्धतीत कृषी साहाय्यक आठवडय़ाला दोनदा एका नियोजित शेतामध्ये आणि एका अन्य शेताला भेट देऊन तेथील छायाचित्र आणि निरीक्षणे या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करत असल्याने जिल्ह्य़ांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव समजण्यास सोयीचे ठरत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. याच पद्धतीने ५०० हेक्?टर क्षेत्रावर असलेल्या चिकू फळाचेही सर्वेक्षण कृषी सहायकांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सध्या कृषी विभागाचा प्रत्यक्ष क्षेत्रभेट पंधरवडा सुरू आहे. जिल्ह्य़ातील विविध भागांतील कृषी अधिकारी भातपिकाचे निरीक्षण, याशिवाय महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या लागवडीच्या पाहणीचे काम सुरू आहे. याशिवाय ‘पंतप्रधान किसान योजने’तील लाभार्थ्यांच्या आधार कार्डवरील आणि योजनेत नोंदवलेल्या नावांमधील तफावत असल्यास दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘पंतप्रधान मानधन योजने’अंतर्गत अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी अधिकारी वर्ग ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका आणि मार्गदर्शन शिबिरे घेत आहेत.

पीकनामा (क्षेत्र हेक्टरमध्ये)