राज्यात १९ जुलै रोजी एकाच दिवसात आढळून आलेल्या करोना बाधित आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली होती. हा उच्चांक बुधवारी मोडीत निघाला. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली असून, यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येणारं महाराष्ट्र देशातील कदाचित पहिलंच राज्य आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडताना नागरिकांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील करोना रुग्णांची जाहीर केली. राज्यात आज (२२ जुलै) १०,५७६ इतके करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ५, हजार ५५२ इतक्या रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ इतके रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ३६ हजार ९८० इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत करोनामुळे १२ हजार ५५६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज करोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले. आज दिवसभरात मुंबईत १ हजार ३१० नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले तर ५८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर आज १ हजार ५६३ जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ५७२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेल्या ७५ हजार ११८ जणांसह आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ५ हजार ८७२ जणांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी समूह संसर्ग सुरू  झालेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे सांगितले आहे. राज्यात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कर्नाटक, केरळ, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात करोना संसर्ग वाढला आहे.  करोनाप्रतिबंधक उपाययोजनांनंतरही वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी केला होता.