मान्सूनच्या पावसाने  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोर धरला असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ४ इंच (१०६ मिमी) पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील माळगाव चाफेखोल मार्गे कुणकवळे राज्यमार्गावरील मोरीला भगदाड पडून रस्ता वाहतूकीस बंद झाला आहे. यामुळे येथील वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी नदीला दुसऱ्या दिवशीही पूर आला आहे. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे, तर भंगसाळ नदीला पूर आला आहे त्यामुळे आंबेडकर नगरमध्ये पाणी आले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे नदीला पुर आला असल्याने दोडामार्ग ते तिलारी वाहतूक अडथळा निर्माण झाला असून तेथे पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.

कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, देवगड तालुक्यातील नदी पात्राशेजारच्या लोकवस्तीतील रहिवाशांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून रस्ते खचण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. सह्यद्री पट्टय़ातील भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे . त्यामुळे नदी काठावर असलेल्या लोकांना दक्षतेचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी मालवण तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक, १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल वेंगुर्ले (१४५.४ मिमी), कुडाळ (११०), सावंतवाडी (१०४) आणि देवगड (१००मिमी) याही तालुक्यांनी शतकी नोंद केली आहे.  उरलेल्या दोडामार्ग (६९ मिमी), वैभववाडी (६७) आणि कणकवली  (६६ मिमी)  या तीन तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडला.