अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर वर्षभरात कोणत्याही तासिकेला उपस्थित न राहता खासगी क्लासमध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांला थेट परीक्षा देता येईल, अशी धक्कादायक पद्धत नाशिकसह पुणे व मुंबई शहरांमध्ये रुजत असल्याचे उघड झाले आहे. प्रवेश क्षमता पूर्ण न होणारी महाविद्यालये आणि खासगी क्लासचालक यांच्या अभद्र युतीतून यापायी पालकांच्या खिशावर वर्षांकाठी एक ते दीड लाखाचा डल्ला मारला जात आहे.
वर्षभर ७५ टक्के उपस्थितीशिवाय परीक्षेला परवानगी नाकारण्याचा विद्यापीठाचा नियमही सर्रास पायदळी तुडवला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे, खासगी क्लासचालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने ही बाब मान्य करत हा प्रकार फोफावण्यास पालकांनाच जबाबदार धरले आहे.
विज्ञान शाखेत स्पर्धात्मक गुणवत्ता यादीमुळे प्रवेश मिळविणे अतिशय जिकीरीचे ठरते. ही प्रवेश प्रक्रिया आणि चांगल्या क्लासमध्ये पाल्यास प्रवेश मिळवून देण्यासाठी पालक कोणतीही किंमत मोजतात. ही बाब लक्षात घेत क्लास चालकांनी काही  महाविद्यालयांशी अलिखित करार करत हा व्यवसाय सुरू केला आहे.
या प्रवेशासाठी महाविद्यालयात न जाता क्लास चालकांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे सादर करून थेट प्रवेश मिळतो. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसोबत अकरावी व बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो. हा विद्यार्थी थेट परीक्षेला येणार असल्याने महाविद्यालयांकडून वर्षभराची उपस्थिती दाखविण्यासाठी नियमित शुल्काच्या तीन ते चार पट जादा शुल्क आकारले जाते. नाशिकमध्ये या पद्धतीने प्रवेश देणाऱ्या तीन ते चार महाविद्यालयांनी गतवर्षी प्रति विद्यार्थी १५ ते २० हजार रुपये शुल्क आकारल्याचे पालकांनी सांगितले. क्लास चालकांचे शुल्कही डोळे पांढरे करणारे आहे. काही क्लासचालक बारावीपर्यंतच्या एकत्रित शुल्कासाठी तीन ते चार लाख रुपये आकारतात.