नगर-सोलापूर रस्त्यावर तालुक्यातील थेरगाव फाटय़ाजवळ रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ट्रक व देवदर्शनासाठी जात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स गाडय़ांचा ओव्हरटेक करताना अपघात होऊन १२ जण जखमी झाले. जखमी राहाता तालुक्यातील व आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील आहेत. त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कांद्याने भरलेला माल ट्रक (एमएच १८ केए ११५) नगरहून बेंगलोरकडे जात होता. समोरून शिर्डीकडे जात असलेल्या दोन ट्रॅव्हल्स (एपी २३ वाय ५१२५ व केए ३५ एफ १३४) यांची ओव्हरटेक करताना धडक झाली. त्यामध्ये मुकेश शशिकांत बेद्रे (४५), नितीन अशोक दहीसर (२५), किशोर सीताराम पेत्रे (२५, सर्व रा. राहणार बाभळेश्वर, राहाता) व सुनीता मानसिंग चव्हाण (४०, रा. विजापूर, कर्नाटक) आदी जखमी झाले. नगर-सोलापूर हा महामार्ग अतिशय अरुंद आहे, त्यामुळे येथे सतत अपघात होत असतात. रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण पाहता हा रस्ता चौपदरी करणे गरजेचे आहे. रस्त्याची खराब अवस्था झालेली आहे.