आषाढीला १३ लाख वैष्णवांचा जागर

मंदार लोहोकरे, पंढरपूर</strong>

टाळ-मृदंगांचा गजर आणि माउली-विठ्ठलाच्या जयघोषात आज भागवतांची राजधानी पंढरी अवघी दंग झाली. गेल्या वीस दिवसांहून अधिक काळापासून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैलाचे अंतर पायी चालत विठ्ठलाच्या ओढीने आलेले लाखो वारकरी आणि भाविकांच्या मांदियाळीत आज एकादशीचा सोहळा संपन्न झाला.

‘बाप आणि आई .माझी विठ्ठल रखुमाई’  या वचनाप्रमाणे लाखो भाविक दरवर्षी आषाढीला पंढरीत येतात. वारकरी संप्रदायात एकादशीचे महत्त्व वेगळे आहे. आषाढी एकादशीला ‘देव शयनी एकादशी’ म्हणूनही ओळखले जाते. या एकादशीला विठ्ठल झोपी जातो. म्हणून तो झोपी जाण्यापूर्वी त्याचे दर्शन घ्यायचे या परंपरेतूनही भाविक मोठय़ा संख्यने पंढरीला येतात. यंदाच्या या एकादशीला पंढरीत जवळपास १३ लाख भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासून चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानंतर या सर्व भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी रांग लावली.

श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेड पासून ४ किलोमीटरवर गेली होती. साधारपणे दर्शनासाठी १६ ते १८ तास लागत होते. या दर्शन रांगेत भाविकांना  उपवासाची खिचडी,चहा,पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले जात होते. मंदिर परिसर आणि शहर स्वच्छ रहावे यासाठी विशेष प्रयत्न दिसून आले.

दरम्यान, सर्व संतांच्या पालख्या दाखल होताच कालपासूनच ही पंढरी हरिनामाच्या गजरात दंग झाली होती. शहरातील विविध मठ, धर्मशाळा, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसर या भागात भजन, कीर्तन आणि हरिनामाचा जयजयकार कानी पडत होता. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यांच्यासोबत यंदा विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यावर अवतरलेले दुष्काळाचे संकट टळू दे, यंदा चांगला पाऊस पडू दे, राज्यातील शेतकऱ्यांना ‘सुजलाम सुफलाम्’ कर असे साकडे विठ्ठलाला घातले.