प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता ठेवत परभणी जिल्हा पोलीस दलामार्फत भरती प्रक्रिया पार पडली आणि १४४ उमेदवारांची आरक्षणाप्रमाणे निवडही जाहीर झाली. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच या भरतीबाबत कुठेच तक्रारही उद्भवली नाही.
जिल्हा पोलीस दलातील १४४ रिक्त पदांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली होती. तब्बल ६ हजार ४०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ६ ते १२ जून दरम्यान पहिल्या टप्प्यात कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप करण्यात आले. भरती दरम्यान पोलीस मैदानावर तरुणांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. शारीरिक चाचणीत ३ हजार ९७२ उमेदवार पात्र ठरले. पहिल्याच टप्प्यात २ हजार ४३० उमेदवार पात्रतेअभावी, तसेच अनुपस्थित राहिल्याने अपात्र ठरले. दुसऱ्या टप्प्यात मदानी चाचणीअंतर्गत ५ किलोमीटर धावण्यासह शारीरिक कसरती पार पडल्या. पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीआधी सर्व उमेदवारांना केळी, बिस्कीट देण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली. तसेच उमेदवारांच्या प्रकृतीसंदर्भात कोणतीही तक्रार उद्भवल्यास जागेवरच प्रथमोचार केंद्र वैद्यकीय पथकासह तनात करण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यात २ हजार ९६९ उमेदवार मदानी चाचणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने मदानी चाचणीस पात्र ठरले. मदानी चाचणीत २६९ उमेदवार ५० व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन लेखी परीक्षेस पात्र ठरले. अशा लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदेवारांची संवर्गनिहाय गुणानुक्रमे यादी तयार करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेसाठी १ हजार ९९३ उमेदवार हजर राहिले. लेखी व मदानी चाचणीतील गुणवत्तेनुसार १४४ उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे निवड झाली.
निवड झालेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय संख्या :  सर्वसाधारण ५७, महिला ४४, खेळाडू ७, प्रकल्पग्रस्त ७, भूकंपग्रस्त २, माजी सनिक १७, अंशकालीन पदवीधर ५, गृहरक्षकदल ५. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक नियती ठाकर, प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.