सिमेंट क्राँकीटच्या जंगलाचे आक्रमण वाढल्याने अनेक जिल्ह्य़ांतील जंगल संपत्तीचा ऱ्हास होत आहे. निसर्गसंपदा म्हणून गणले गेलेले जंगल आणि त्यात दिसणारे विविध प्रजातींचे पक्षी आता दूर्मिळ होऊ लागले आहेत. हे पक्षी पाहता यावे, त्यांना संरक्षण मिळावे, त्यांची वाढ व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून  पक्षीगणना अभियान काही पक्षीप्रेमी संघटनांकडून राबविण्यात येत आहे. अलिबागमध्ये नुकतेच असे अभियान पार पडले त्यात ४० पक्षी निरीक्षकांनी सहभाग दर्शवून अलिबाग तालुक्यात विविध पक्ष्यांच्या १६३ प्रजाती वास्तव्याला असल्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. गिधाडाचे अस्तित्व संपुष्टात आल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.  अलिबाग आणि उरण परिसर हा पूर्वीपासून वेगवेगळ्या पक्ष्यांचे अधिवास असणारा परिसर म्हणून ओळखला जायचा. मात्र उरण परिसरातील वाढते शहरीकरण, औद्य्ोगिकीकरण यामुळे पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र मोठय़ा प्रमाणात घटले आहे. परिणामी या परिसरातील पक्ष्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणाही मिटल्या आहेत. अलिबाग परिसरात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या अधिवास क्षेत्राची नोंद करणे, पक्ष्यांबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणे आणि या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती संकलित करणे हा उद्देश ठेवून या ‘बर्ड रेस’चे आयोजन तालुक्यातील नागाव येथे करण्यात आले होते. पक्षी निरीक्षणासाठी रेवस समुद्रकिनारा, आक्षी समुद्रकिनारा, साताड बंदर, सिध्देश्वर, रामधरणेश्वर, रसानी डोंगर, फणसाड अभयारण्य, कुरुळ वसाहत, थळ  आणि नागाव परिसराची निवड करण्यात आली होती, अशी माहिती  स्पर्धेचे आयोजक सागर म्हात्रे यांनी दिली.

४४ प्रजाती देशविदेशांतील पक्षी निरीक्षकांनी केलेल्या निरीक्षणात अलिबाग परिसरात  पक्ष्यांच्या ३२० पैकी १६३ प्रजाती असल्याचे या अभियानात आढळून आले. यातील ४४ प्रजाती या इतर देशाविदेशांतून स्थलांतरित होऊन या परिसरात वास्तव्याला आले आहेत. त्यात विशेष म्हणजे कोकणात फारसा न आढळणारा उत्तरी गृह पंकोळी (Northen house martin) हा पक्षी अलिबाग परिसरात पहिल्यांदाच आढळून आल्याची माहिती या वेळी मिळाली.  याशिवाय अनेक दुर्मिळ पक्ष्यांत प्रामुख्याने चक्रवाक अर्थात (Ruddy shell duck) तलवार बदक(Northen pintail) करडय़ा मानेचा भारीट, सायबेरियन गप्पीदास, नीला माशिमार, पांढऱ्या कंठाची मनोली, गुलाबी मैना, करडा धनेश, टकाचोर, टिकेलची निळी माशिमार, हुदहुदया, छोटा गोमेट, हळदीकुंकू बदक, बहिरी ससाणा, कोतवाल, हळद्य, लांब शेपटीचा खाटीक यांचा अधिवास असल्याचे आढळले.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरातील गिधाडाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष या ‘बर्ड रेस’मधून समोर आला. कारण स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा टीममध्ये एकालाही गिधाड अथवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या नाहीत.

  • गिधाडाचे अस्तित्व संपुष्टात
  • उत्तरी गृह पंकोळीचे प्रथमच दर्शन
  • उरण परिसरातील औद्य्ोगिकीकरणामुळे पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र घटले