भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर जळगाव महापालिकेतील भाजपच्या १७ नगरसेवकांनी आपले राजीनामास्त्र बुधवारी संध्याकाळी लगेचच म्यान केले. जळगावमधील नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सामुहिक राजीनामे देणार होते. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते वामनदादा खडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. पण लगेचच बुधवारी संध्याकाळी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे स्पष्ट केले.
नगरसेवकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात लिहिले होते की, आमचे श्रद्धास्थान व मार्गदर्शक तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून निराधार आरोप केले जात आहेत. यात कोणताही जनाधार नसणारे व नगसेवकपदी निवडून येण्याची कुवत नसलेले नाथाभाऊंवर आरोप करीत आहे. तर स्वतःवर गुन्हे दाखल असलेला कंत्राटदार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कथित एथिकल हॅकर मनीष भंगाळे यास हाताशी धरण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात नाथाभाऊंसारख्या लोकनेत्याची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे निदर्शनास आले आहे. नाथाभाऊवर आरोप होत असताना पक्षातील नेत्यांनी मौन बाळगले. यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात संशय निर्माण झाला आहे. नाथाभाऊ यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर आरोप होत असताना आमचा पक्ष पाठीशी उभा राहत नसेल तर आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांवर अशी वेळ आल्यास काय होईल, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. नाथाभाऊंवरील खोट्या आरोपांची चौकशी करण्यात येऊन यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे