पेण तालुक्यातील निगडे गावातील जनार्दन शिवराम नाईक यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक कार्यासाठी जमा केलेल्या वर्गणीचा हिशेब मागितला म्हणून जनार्दन शिवराम नाईक यांच्या कुटुंबाला गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकले होते.
व्यापक जनजागृतीनंतरही रायगड जिल्ह्य़ातील सामाजिक बहिष्काराची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे प्रबोधन करून समजाला लागलेली बहिष्काराची कीड आता संपणार नाही. त्यासाठी कठोर पावलेच उचलावी लागतील, हे मात्र निश्चित झाले आहे. पेण तालुक्यातील आमटेमजवळ असलेल्या निगडे गावात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण आता समोर आले आहे.
गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या देणग्यांचा हिशेब मागितला म्हणून जनार्दन शिवराम नाईक यांच्या कुटुंबाला गावकीने वाळीत टाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
नाईक यांच्या कुटुंबावर गावातील सामाजिक धार्मिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास र्निबध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आले आहे. एखाद्या कुटुंबाने संबंध ठेवला तर त्याच्यावर आíथक दंडाची कारवाई केली जात आहे.
एवढेच नव्हे तर गावातील मंदिरात देवदर्शनासाठी आडकाठी करणे, खासगी पाण्याच्या पाइपलाइनचे तोडून नुकसान करणे, यासारखे अघोरी प्रकार गावकीकडून सुरू असल्याचे जनार्दन नाईक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये गावचे पोलीस पाटील नंदकुमार म्हात्रे पोलीस पाटील यांचादेखील समावेश आहे.
 सुरुवातीला वडखळ पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला होता. मात्र पीडित कुटुंबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली होती. यानंतर पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश वडखळ पोलिसांना दिले होते.  यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्यापि कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलीस निरीक्षक बोराटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. उपविभागीय अधिकारी देशपांडे यांनीही पीडित कुटुंबांची भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत.