रायगड जिल्ह्य़ात गेल्या दोन वर्षांत लाचखोरीची ३८ प्रकरणे समोर आली असून लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या ११ जणांकडून तब्बल १८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्य़ात २०१३ ते २०१५ दरम्यान तब्बल ३८ लाचखोरीची प्रकरणे समोर आली. यात २०१३ मधील सात प्रकरणांचा समावेश होता. या कारवाईत महसूल विभागाचे कर्मचारी विनोद लचके यांच्याकडून ७८ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम, तर तहसीलदार युवराज बांगर यांच्याकडून ७१ लाख ६३ हजार अशी १ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
२०१४ मध्ये लाचखोरीची २८ प्रकरणे समोर आली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गिरीशकुमार पारिख यांच्याकडून १ कोटी ९३ लाख, नगररचना विभागाच्या अधिकारी दिशा सावंत यांच्याकडून १ कोटी २८ लाख, साहाय्यक नगररचनाकार राजू पंडित यांच्याकडे १ कोटी ४ लाख, लिपिक तुलशीदास राठोड यांच्याकडे ३८ लाख ८४ हजार, बांधकाम विभागातील अभियंता बुधेश रंगारी यांच्याकडे २ कोटी ४३ लाख, नायब तहसीलदार दिलीप संख्ये यांच्याकडे १८ लाख ४२ हजार, नायब तहसीलदार रंजना मोडक यांच्याकडे २ लाख ६० हजार असे एकूण १५ कोटी ५९ लाख रक्कम जप्त करण्यात आली.
तर २०१५ च्या जानेवारी महिन्यात अभियंता बिराजदार यांच्याकडून ४६ लाख २५ हजार, तर यादव यांच्याकडून ७० लाख रुपयांची अशी १ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात रायगडचा लाचलुचपत विभाग आघाडीवर आहे.