देशभरात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी संध्याकाळी खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मेल- एक्स्प्रेस  विलंबाने धावत आहेत.

गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. यात रुळालगतचे खांबही कोसळले. अपघातात रेल्वे रुळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. डबे हटवण्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे नेमके कारणही अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अपघातात झालेले नुकसान पाहता दुरुस्तीसाठी आणखी काही तास लागण्याची चिन्हे आहेत. अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस खोळंबल्या असून लोणावळा स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यापूर्वी २१ ऑगस्टरोजी खंडाळ्यातील मंकी हिल येथे हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. तर १८ जुलै रोजी मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले होते. रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने ही घटना घडली होती.

खंडाळ्यातील घटना ताजी असतानाच डहाणूजवळही मालगाडीचा एक डबा रुळावरुन घसरल्याचे वृत्त आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिवसभरातील हा चौथा रेल्वे अपघात आहे. सकाळी उत्तर प्रदेशच्या सोमभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे रुळांवरुन घसरले होते. शक्तीपुंज एक्स्प्रेस हावड्याहून जबलपूरला जात असताना हा अपघात झाला होता. त्यानंतर रांची राजधानी एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नव्हती.