मुंबई -गोवा महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात २ जण ठार चार जण जखमी झाले. पहिला अपघात मिनीडोअर आणि ट्रेलर यांच्या धडक दिल्याने झाला तर दुसरा अपघात सँट्रो कार आणि मोटरसायकल यांच्यात झाला. मुंबई -गोवा महामार्गावरील पेणजवळ रविवारी पहाटे सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रेलर आणि मिनीडोअर रिक्षा यांची समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात कामार्ली येथील सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर खारसापोली बेडे येथील प्रसाद पाटील आणि कार्माली पेण येथील सुरेश मुसळे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सुरेश मुसळे यांचा मृत्यू झाला. याच महामार्गावर जिते गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ दुसरा अपघात झाला. सँट्रो कारने मोटर सायकलला जोरदार धडक दिली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास झालेल्या या अपघातात मोशर अली हा केरळ येथे राहणारा तरुण गंभीररीत्या जखमी झाला, तर कांजुरमार्ग मुंबई येथील शंकर भिलारे जखमी झाले. मोटर सायकलस्वार मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता, तर सँट्रोकार मुंबईच्या दिशेने येत होती. जखमीना उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

जळगावमध्ये सर्वत्र पावसाची हजेरी

जळगाव : पावसाने मागील ४८ तासांत जिल्ह्य़ात सर्वत्र हजेरी लावली असून रविवापर्यंत जिल्ह्य़ात ४८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भुसावळ तालुक्यात सर्वाधिक ८४.५ मिमी, तर सर्वात कमी चोपडा तालुक्यात १२ मिमी नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पेरण्यांनाही वेग आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्य़ात चार लाख ३० हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा अपेक्षित आहे. जिल्ह्य़ात काहीसा पाऊस लांबल्याने १५ जूनपर्यंत केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर बागायती कापसाचा पेरा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.