लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरात रुग्ण वाढीचे सत्र कायम आहे. आणखी २२ नव्या रुग्णांची मंगळवारी भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ६२७ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १३१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोल्यात करोना संसर्गाने अद्यापही थांबण्याचे नाव घेतले नाही. मंगळवारी आणखी २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ४९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २७ अहवाल नकारात्मक, तर २२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ६२७ झाली. आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली.

आज सकाळच्या अहवालानुसार २२ जण नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये १० पुरुष व १२ महिला आहेत. दोन महिलांना स्त्री रुग्णालयातून पाठविण्यात आले आहे. यामध्ये रजतपूरा येथील तीन, सिंधी कॅम्प, माळीपूरा, अशोक नगर अकोट फैल येथील प्रत्येकी दोन रुग्ण, तर तारफैल, शहर कोतवाली, जठारपेठ, आंबेडकर नगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, उमरी नाका, खदान, पुरानी मशीद आणि अलिम चौक खदान येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. रुग्ण आढळून आलेला परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहे. शहरात प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

आणखी २० जणांना रुग्णालयातून सोडले
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६२७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४६२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज सोडण्यात आलेल्या २० जणांचा समावेश आहे. त्यातील सात जण संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली, तर १३ जणांना घरी सोडण्यात आले. यामध्ये रामदास पेठ, अकोट फैल येथील प्रत्येकी तीन, पातूर, शहर कोतवाली प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, मलकापूर, मोहता मिल, गुलजार पूरा, अगरवेस, फिरदोस कॉलनी, शिवर, रजतपूरा, तारफैल, कमलानगर येथील रहिवासी प्रत्येकी एक आहे.