वॉटर इज लाईफ सोसायटी व स्टेट बंॅकेने योगदान

वन्यजीवांची तृष्णातृप्ती अत्यंत गरजेची असून वॉटर इज लाईफ सोसायटीच्या माध्यमातून स्टेट बॅक ऑफ इंडियाने या उपक्रमात योगदान दिले याचा आनंद आहे. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष संपल्यागत असून यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी एकही वन्यजीव मृत्यूमुखी पडल्याची नोंद नाही, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. वॉटर इज लाईफ सोसायटीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक व्ही. रामलिंग यांनी येथे काढले.

या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबातील पाणवठय़ांजवळील हातपंपाला सौरपंपांव्दारे दिवसभर पाणी पुरेल, असा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात सुमारे ४५ सौरपंप लावून वन्यप्राण्यांसाठी मुबलक पाणी सोडण्यात येत असून या उपक्रमाचा फार मोठा लाभ झाल्याचे मत यावेळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी रामलिंग व गरड यांच्यासह भारतीय स्टेट बंॅकेचे उपमहव्यवस्थापक श्रीशंकर, वॉटर इज लाईफ सोसायटीचे संचालक धनंजय बापट, जयंत रानवळकर, डॉ. अनिल पिंपळापुरे, डॉ. निरंजन धारसकर, दिना रूपदे, डॉ. किरण कुळकर्णी, समीर देशमुख, राजू मोरोने उपस्थित होते.

वॉटर इज लॉईफ सोसायटीतर्फे चार वर्षांंपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. आधी कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. दोन वर्षांंपासून सोसायटीनेच लहानग्या सौरपंपातून सतत या पाणवठय़ांवर जवळच्या हातपंपातून पाणी जात राहील, अशी आगळी योजना आखून ती यशस्वी केली.

पूर्वी हा उपक्रम ताडोब्याच्या बफर झोनमध्ये राबवला जात होता. यंदा कोअर झोनमधील सुमारे ४५ पाणवठय़ांवर तो कार्यान्वित होत आहे. यासाठी स्टेट बंॅकेने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून २५ लाखंची मदत केली.

अशीच मदत त्यांनी महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, सह्य़ाद्री, बोर, नवेगांव-नागझिरा व उमरेड-कऱ्हंडला या व्याघ्र प्रकल्पांसाठी करावी, अशी इच्छा धनंजय बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचा एक फलक ताडोबा प्रकल्पाच्या मोहुर्ली प्रवेशव्दारावर लावण्यात आला असून त्यातून पाणी जीवन आहे, असा संदेश देण्यात आला आहे.

या फलकाचे उद्घाटन व्ही. रामलिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी एका पाणवठय़ावरील सौरपंपाचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले.

(((   ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वॉटर इज लाईफ सोसायटी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने लावलेल्या सौरपंपचे लोकार्पण करतांना स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापकव्ही. रामलिंग, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जे. पी. गरड व धनंजय बापट.   )))