बीड : देशातील सहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असताना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत.

मुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.

दिल्लीत २४ कावळे, १० बदकांचा मृत्यू

नवी दिल्ली: केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा व गुजरात या राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रसार झालेला असतानाच दिल्लीत जसोला पार्क येथे २४ कावळे तर संजय सरोवरात १० बदके मृतावस्थेत आढळून आली आहेत. दरम्यान दिल्लीतील गाझीपूरची कोंबडय़ांची बाजारपेठ दहा दिवस बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जारी केले आहेत.

बदकांचे नमुने घेण्यात आले असून ते पशुसंवर्धन खात्याला देण्यात आले आहेत.

जुनागडमध्ये ४, जम्मूत १५० कावळे मृत

गुजरातमधील जुनागड जिल्ह्य़ात मंगरोळ येथे चार कावळे मृतावस्थेत सापडले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जम्मूमध्ये राजौरी, कथुआ व उधमपूर भागात एकूण १५० कावळे मृतावस्थेत सापडले असून नमुने जालंधर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.