News Flash

तीन नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती

दीड हजार रिक्त पदांमुळे अडचणी

(संग्रहित छायाचित्र)

दीड हजार रिक्त पदांमुळे अडचणी

सुहास बिम्ऱ्हाडे, लोकसत्ता

वसई: येत्या नवीन वर्षांत मीरा-भाईंदर, वसई-विरार शहरात ३ नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार असून अडगळीत असलेल्या तीन पोलीस ठाण्यांचे नव्या इमारतीत स्थलांतर केले जाणार आहे. दुसरीकडे नव्या आयुक्तालयात १ हजार ४८८ पोलिसांची पदे रिक्त असून शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्ह्यंचा तपास करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून ‘मीरा-भाईंदर, वसई-विरार हे नवीन पोलीस आयुक्तालय १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले. सध्या या पोलीस आयुक्तालयात वसईतील सात आणि मीरा-भाईंदरमधील सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यासाठी मीरा, भाईंदर, वसई आणि विरार अशा तीन परिमंडळांची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्रफळ मोठे असून वसई-विरार शहरातील लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नव्या पोलीस आयुक्तालयासाठी ३ हजार ३२१ पोलीस बळ मंजूर आहे, मात्र केवळ १ हजार ३३ पोलीस हजर असून १ हजार ४८८ पोलिसांची कमतरता जाणवत आहे.

नव्या पोलीस आयुक्तालयात सात साहाय्यक पोलीस आयुक्त, ३७ पोलीस निरीक्षक, ४८ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ९१ पोलीस उपनिरीक्षक, ८९ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच १ हजार २१५ पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पोलिसांच्या कमतरतेमुळे गुन्ह्यंना प्रतिबंध घालण्यात तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक अडचणी येत आहेत. न्यायवैद्यक, श्वान पथक, हस्ताक्षर पडताळणी, बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथके आदी मनुष्यबळाअभावी स्थापन करता येत नाही. रिक्त पदे मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून नवीन वर्षांत ही पदे भरली जातील असे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले.

 नवीन वर्षांत ३ नवीन पोलीस ठाणी आणि ३ पोलीस ठाण्यांचे स्थलांतर 

नवीन पोलीस आयुक्तालयात एकूण पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी येत्या वर्षांत मांडवी, नायगाव आणि पेल्हार अशा तीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय तुळिंज, वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्यांच्या इमारती नव्या जागेत स्थलांतरित केल्या जाणार आहेत.

माणिकपूर पोलीस ठाणे हे निवासी इमारतीत भाडय़ाच्या गाळ्यांमध्ये आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना देखील येथे येणाऱ्या तक्रारदारांचा आणि इतर त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे मागील काही वर्षांंपासून भाडे थकविल्याने गाळे मालकाने ते खाली करण्यासाठी विनंती देखील केली आहे. नालासोपाम्ऱ्यातील तुळिंज पोलीस ठाणे हे नाल्यावर बांधण्यात आले आहे. नाल्याची साफसफाई करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना मधोमध असलेली झाकणे उघडावी लागतात. त्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीचा सामना येथील पोलिसांना आणि नागरिकांना करावा लागत आहे. वालीव पोलीस ठाणे देखील अडगळीत उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे या तिन्ही पोलीस ठाण्यांसाठी प्रशस्त इमारती बांधल्या जाणार असून त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली. येत्या वर्षांत ही तीनही पोलीस ठाणी नवीन जागेत स्थलांतरित केली जातील तसेच तीन नवीन पोलीस ठाणी तयार केली जातील असे आयुक्त दाते यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:20 am

Web Title: 3 new police stations will be set up in mira bhayander vasai and virar zws 70
Next Stories
1 प्रकल्प, योजनांचा संकल्प
2 उदरनिर्वाहासाठी पुन्हा सोडून जातो गाव..
3 रस्त्यावर बेकायदा उभ्या वाहनांचा अडथळा दूर
Just Now!
X