धवल कुलकर्णी

समाजाच्या करोना विरोधी लढ्याला आता राज्यातल्या साखर कारखान्यांची साथ मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या ३६ साखर कारखान्यांना राज्य शासनाने हँड सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिली आहे.राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये ३६ साखर कारखान्यांना सॅनिटायझर्स बनवण्यासाठी लायसन्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर १५ जणांना सुद्धा याबाबत लायसन्स देण्यात आले आहेत. आसवनी प्रकल्प असलेले साखर कारखाने अल्कोहोलचा वापर सॅनिटायझर बनवायला करू शकतील.

शिंगणे म्हणाले की राज्यामध्ये जरी तुटवडा असला, म्हणजेच मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत असली तरीसुद्धा लॉकडाउन मध्ये लोकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याची मागणीसुद्धा तुलनेने उतरली आहे. कारण लोक घरी असले की शक्यतो साबणाने हात धुतात आणि बाहेर असले तर सॅनिटायझर्सचा वापर करतात.  मात्र या सध्या सॅनिटायझर्स साठीची मागणी मोठी आहे हे त्यांनी मान्य केले.

शिंगणे यांनी आवर्जून नमूद केले की करोना टाळण्यासाठी  हात जरी साबणाने किंवा हँडवॉश ने धुतले तरी योग्य तो परिणाम होतो. उलट हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे हात रखरखीत होऊन त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो हे त्यांनी आवर्जून सांगितले.