डहाणू तालुक्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून ढगांच्या जोरदार कडकडाटात आणि विजांच्या लखलखाटात परतीच्या पावसाने जोर धरला आह़े त्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनांत वीज पडून दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे आठ दिवसांतील ‘वीजबळीं’ची संख्या चार झाली आहे.
सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुंगवाडा येथील माजी उपसरपंच अनंत तुकाराम बारी (४८) हे मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. अचानक जोराचा पाऊस
आणि प्रचंड वीजा चमकू लागल्याने ते
घराकडे येण्यासाठी निघाले असताना
अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे ते आधीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तर जांबूगाव येथील देवऱ्या महाद्या गोरखाना हा शेतात जात असताना अचानक प्रचंड पाऊस आणि विजा चमकत असल्याने एका झाडाच्या आडोशाला उभा राहिला होता. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली आणि झाड गोरखाना यांच्या अंगावर पडले. त्यात त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला.
दरम्यान, मागच्या गुरुवारी धरमपूर येथे मधुकर केशव बेलकर आणि गोविंद यशवंत हाथोडी यांच्या अंगावर वीज पडून त्यांचाही जागी मृत्यू झाला होता.
काही दिवसांपूर्वी डेहणेपळे येथील मदन शंकर बोंडवा हे पाण्यात वाहून गेले होते. त्याच्या कुटुंबीयांना तहसीलदार महेश सागर यांनी सोमवारी नैसर्गिक आपत्ती साहाय्य फंडातून दीड लाख रुपयांची मदत दिली.