लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. आज एकाच दिवशी तब्बल ४० जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ६६७ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १५५ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोल्यात करोना संसर्गाची वाढ वेगाने होत आहे. जिल्ह्यातील एकूण १३८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ९८ अहवाल नकारात्मक, तर ४० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ६६७ झाली. आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली. आज सकाळच्या अहवालानुसार ३६ नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये २२ पुरुष व १४ महिला आहेत. त्यातील ११ जण अकोट फैल, देशमुख फैल येथील पाच जण, कैलास टेकडी, खदान, न्यू तारफैल येथील प्रत्येकी तीन जण, तर पाक्करपूरा अकोट, अनिकट, बलोदे ले आऊट, जिल्हा स्त्री रुग्णालयसमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदासपेठ, गुलजार पुरा, तारफैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी चार रुग्णांची वाढ झाल्याने आज दिवसभरात एकूण ४० रुग्ण वाढले. ते चार खदान, अकोट फैल, शिवाजी नगर, संताजी नगर येथील रहिवासी आहेत. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. रुग्ण आढळून आलेला परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहे. शहरात प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.

आतापर्यंत ४८८७ अहवाल नकारात्मक
जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण ५५८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३०६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५५५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ४८८७ आहे, तर सकारात्मक अहवाल ६६७ आहेत. २९ अहवाल प्रलंबित आहेत.

४७८ जणांची करोनावर मात
आतापर्यंत जिल्ह्यातील ४७८ जणांनी करोनावर मात केली. त्यापैकी आज १६ जणांना सुट्टी देण्यात आली. त्यात चार महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण अकोट फैल, तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूतपुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत. १६ जणांपैकी तीन जणांना घरी, तर १३ जणांना संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.