केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची मागणी
वीज प्रकल्प प्रदूषणामुळे ४२० नागरिकांचा मृत्यू
शासकीय व खासगी वीज प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने ४२० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते प्रदूषण लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्य़ाला किमान वीज देयकातून सूट व अल्पदरात वीज पुरवठा करावा, असे आवाहन केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केले आहे.
जिल्ह्य़ात अनेक मोठे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्याची झळ नागरिकांना बसत आहे. जिल्ह्य़ात २०१० ते २०१५ या काळात प्रदूषणाने ४२० नागरिकांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. खासगी रुग्णालयांतील मृत्यूचे आकडे उपलब्ध नसून ते सरकारी रुग्णालयांमधील मृत्यूंपेक्षा अधिक आहेत. वीज प्रकल्पांमुळे वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर वाढले असून, यामुळे दमा आणि विविध प्रकारचे श्वासविकार, त्वचा, क्षयरोग आणि अनेक जलजन्य आजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पांमुळे जिल्ह्य़ातील जनतेचे जीवनमान सतत धोक्यात येत असल्याने यावरील नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानिर्मिती कंपनीकडून याबद्दल प्रभावी उपाययोजना होत नसल्याने हा प्रश्न अधिक धोकादायक होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील अनेक पर्यावरणवादी संस्था आणि नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करून प्रदूषण तातडीने नियंत्रणात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, ती अजूनही पूर्ण झालेली नाही. जिल्ह्य़ातील जनता अकारण प्रदूषण सहन करीत जीव धोक्यात टाकत असल्याने आणि यामुळे त्यांना होणाऱ्या आजारावरील उपचारासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने शासनाने याबाबत त्वरित महावितरण कंपनीला निर्देश देऊन या जिल्ह्य़ातील नागरिकांना वीज देयकात सूट देण्याची आणि या क्षेत्रात होणारा वीज पुरवठा अल्पदरात करावा, अशीही मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे त्यांनी केली आहे.

‘आम्ही प्रदूषण सहन करत असल्यामुळे आम्हाला किमान वीज देयकातून सूट व अल्पदरात वीज पुरवठा करावा’
-केंद्रीय खते व रसायन मंत्री अहीर