पाणी साचण्याचे नवीन ४३ ठिकाणे; पाणी उपसा करण्यासाठी केवळ ५ पंप

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वाढती लोकसंख्या आणि नियोजनशून्य बांधकामे यामुळे शहरातील पाणी जाण्याचे मार्ग बंद होऊ लागले आहे. या वर्षांत पाणी साचून राहण्याचे सखल भागात ४३ ने वाढ झाली आहे. आता शहरात एकूण १०९ सखल भाग झाले आहेत. या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडे केवळ ५ पंप आहेत.

वसई-विरार महापालिकेने पावसाळ्यात मोठे जलसंकट उभे राहते. यंदा देखील हे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी शहरात ६६ सखल भाग होते. यंदा शहरातील पाणी साचण्याच्या सखल भागांमध्ये ४३ ने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण सखल भागांची संख्या आता १०९ एवढी झाली आहे. सखल भागातील पाण्याचा निचरा आठवडाभर देखील होत नाही कारण पालिकेकेडे पाण्याचा उपसा करम्ण्यासाठी पुरेसे पंप नाही. संध्या पालिकेकडे ५ सक्शन पंप आहेत. त्यामुळे एवढय़ा भागाला हे पंप पुरसे ठरतील का असा सवाल उपस्थित झाला आहे. याबात माहिती देताना पालिकेचे मुख्य अग्निशम अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले की, सखल भागात वाढ झाली हे खरे असले तरी यातील अनेक भाग नागरिकांसाठी धोकादायक नसतात. ज्या रहिवाशी क्षेत्रात पाणी साचते, ज्या वसाहतीमधील नागरिक पाण्यामुळे अडकून पडतात अशा ठिकाणचे पाणी उपसणे गरजेचे असते. सध्या आमच्याकडे ५ पंप आणि ५ बोटी आहेत. तेवढे पुरसे असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालिकेने पुरेसे पंप असल्याचा दावा केला असला तरी शहराच्या अनेक भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा ८ ते १० दिवस उलटूनही होत नसल्याचे मागील वर्षी समोर आले होते. दोन वर्षांंपूर्वी वसईत  पूरपरिस्थिती उद्भवली असताना अनेक भागात अशाप्रकारे पाणी साचले होते. ते उपसण्यासाठी पालिकेला मुंबई महापालिकेकडून भाडय़ाने पंप मागवावे लागले होते. वसईच्या डीजी नगर, दिवाणमान आदी परिसर, नालासोपारा आणि विरार मधील अनेक इमारतीत पाणी साचलेले होते. यामुळे त्या परिसरातील वीज पुरवठा देखील सुरू करता येत नव्हता. याशिवाय साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे. अधिक पंप मागविण्यात येतील असे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी देखील सांगितले होते.

अवघ्या ५ पंपाने शहरातील १०९ सखल भागातील पाण्याचा उपसा करणे अशक्य आहे. त्यासाठी पालिकेने अधिक पंप मागवावे अन्यथा शहराला रोगराईचा विळखा बसेल असे भाजपाचे नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सुमारे ४ कोटी

चालू आर्थिक वर्षांत पालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पाण्याचा उपसा करण्यासाठी लागणारे पंप, बोट यासाठी ३ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात पालिकेकडे केवळ ५ पंप असल्याचे समोर आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी यंदाही हेलिकॉप्टर मागविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मागील वर्षी चिचोंटी धबधब्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करम्ण्यात आले होती.

शहरातील सखल भाग

* विरार पूर्व—              १५

* विरार पश्चिम—        १८

* नालासोपारा पूर्व—      २३

* नालासोपार पश्चिम— १०

* वसई पुर्व—                १४

* वसई पश्चिम—         १८

* नायगाव पुर्व—           ०८

नायगाव पश्चिम—       ०३