वर्धा : वंध्यत्वावर आलेली अडचण ‘टेस्ट टय़ूब’ बेबीच्या माध्यमातून दूर झाल्यानंतर एका ४७ वर्षीय मातेची मातृत्वाची आस पूर्ण करण्यात सावंगी येथील डॉक्टरांना यश आले.

सावंगीच्या टेस्ट टय़ूब बेबी सेंटरच्या प्रमुख डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी मातेच्या चेहऱ्यावर आनंद आणला. मध्यप्रदेशातल्या रिवा जिल्हय़ातील देवतलाबचे अर्चना व विनोद शुक्ला हे दांपत्य गत वीस वर्षांपासून नागपुरात स्थायिक झाले आहे. श्रीमती शुक्ला यांना गर्भाशयातील गाठीमुळे आलेल्या वंध्यत्वासोबतच आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. लग्नानंतर दीर्घकाळ अपत्य प्राप्ती न झाल्याने श्रीमती शुक्ला (४७) यांनी सतत पंधरा वर्षे नागपुरातील विविध रुग्णालयात उपचार घेतले. त्यासाठी दहा लाख रुपयाहून अधिक खर्चही केला. पण यश आले नव्हते. अखेर अडीच वर्षांपूर्वी त्यांनी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. विभाग प्रमुख डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारांना यश मिळत आहे, असे दिसत असतानाच दरवेळी मातृत्व हुलकावणी देत होते.

गर्भाशयात वाढलेल्या गाठी, दीर्घकाळचा मधुमेह अणि नव्याने निर्माण झालेला दृष्टिदोष अशा व्याधीमुळे गर्भधारणा होऊनही यश मिळत नव्हते. या दीड दोन वर्षांतील सलग तिसऱ्या प्रयत्नाला अखेर प्रतिसाद मिळाला. मातृत्वाचा हा आनंद टेस्ट टय़ूब बेबी प्रक्रियेद्वारे अर्चना शुक्ला यांच्या वाटय़ाला आला. १९ जुलैला तीन किलो वजनाचे एक सुदृढ बाळ जन्माला आले. आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.

उपचार चमूत डॉ. शौर्या आचार्य, उर्वशी शर्मा, रेवत मेश्राम, गौरव शर्मा, करुणा ताकसांडे, शबनम परकार, आकाश मोरे या डॉक्टरांसह परिचारक सुरेंद्र यादव, रंजना दिवे, गीता कुबडे यांचाही समावेश होता.

डॉ. दीप्ती श्रीवास्तव म्हणाल्या की, या प्रक्रियेत सुधारणा होत असून १०० पैकी ७० स्त्रियांना मातृत्व प्राप्त होते. उपचारात सातत्य ठेवण्याची व धर्य बाळगण्याची मात्र गरज असते. गर्भाशयातील गाठी व मधुमेह असतानाही अर्चनाने ही जोखीम स्वीकारली. याच दरम्यान तिच्या डोळय़ाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. अखेर धर्याचे सकारात्मक फळ तिला मिळाले. सावंगी रुग्णालयात अशा अपत्यप्राप्तीची गत वीस दिवसातील ही दुसरी आनंददायी घटना असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.