कोयना धरण क्षेत्रात तुलनेत अगदीच कमी पाऊस झाल्याने ऐन पावसाळय़ात धरणाचा पाणीसाठा वाढण्याऐवजी कमीच झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ५६ टीएमसीहून कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी दोन तृतीयांशहून अधिक भरलेले कोयना धरण सध्या रितेच असल्याने कृष्णा, कोयनाकाठी पाणी संकटाचे ढग दाटून आले आहेत.
कोयना प्रकल्पाच्या चालू तांत्रिक वर्षांत अर्थात १ जूनपासून गत ४० दिवसांत धरणाचा पाणीसाठा सुमारे ४ टीएमसीने कमी झाला आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेचे महाकाय कोयना जलाशय सध्या तळ गाठून असून, धरणात जवळपास ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी आजमितीला धरणाचा पाणीसाठा जवळपास ६९ टीएमसी म्हणजेच ६५.५५ टक्के होता. पैकी ६३.८८  म्हणजेच ६०.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
गत हंगामाच्या प्रारंभी कोयनेचा पाणीसाठा ३२. ९४ टीएमसी म्हणजेच ३१.२९ टक्के होता. तर, आजअखेरच्या ४० दिवसांत प्रकल्पामध्ये भरघोस अशा ४० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने मान्सूनचे पहिले सत्र पुरते कोरडे गेले आहे. यंदा १६.१२ टीएमसी म्हणजेच १५.३१ टक्के पाणीसाठा असताना, कोयना प्रकल्पाच्या तांत्रिक वर्षांस प्रारंभ झाला. मात्र, निचांकी पाऊस झाल्याने पावसाळय़ास सव्वा महिना उलटला असताना, धरणाचा पाणीसाठा ४ टीएमसीने कमी होऊन तळ गाठून आहे.
चालू हंगामात धरण क्षेत्रात सरासरी ४९३.६६ मि. मी. तर, गतवर्षी २,१६३.७५ मि. मी. पावसाची नोंद आहे. त्यात नवजा विभागात ६१२ गतवर्षी २२९४ मि. मी. पावसाची नोंद आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ५५८ गतवर्षी २०१२ मि. मी. तर, महाबळेश्वर विभागात ३११ गतवर्षी २१८१ मि. मी.
दरम्यान, चिंताजनक पाऊस व कोयना धरणातील पाणीसाठय़ामुळे कृष्णा, कोयनाकाठ चांगलाच हादरला असून, शेतकऱ्यांवर खरिपाच्या दुबार पेरण्यांचे संकट ओढावले आहे. परिणामी बाजारपेठांवरही दुष्काळाची छाया दिसून येत असून, पाणीटंचाईची दाहकता आ वासून असल्याचे चित्र आहे.