जळगाव : जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणे सुरूच असून शनिवारी दुपापर्यंत ही संख्या ६२१ पर्यंत पोहचली आहे. शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या ११९ अहवालांमध्ये ९८ अहवाल नकारात्मक, तर २१ अहवाल सकारात्मक आले आहेत.

सकारात्मक अहवालांमध्ये चाळीसगाव तीन, चोपडा पाच, धरणगाव दोन, वरणगाव पाच, एरंडोल तीन, भडगाव एक, निंभोरा आणि रावेर येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

कोविड योद्धा सफाई कामगारांचा गौरव

चोपडा नगर परिषदेमार्फत करोनाविरोधात लढणाऱ्या सफाई कामगारांना मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी प्रत्येकी एक हजार रूपये बक्षीस आणि गौरवपत्र बहाल केले. पालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ९५ स्वच्छता कामगारांना याचा लाभ दिल्याचे मुख्याधिकारी गांगोडे यांनी कळविले आहे.ह्णअर्हनिश सेवामहेह्ण याप्रमाणे कोविड-१९ विरूध्द लढा देतांना सफाई कामगारांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. जिवाची पर्वा न करता शहराची साफसफाई करुन निगा तर ठेवलीच, शिवाय कराना योद्धा म्हणून अभूतपूर्व काम केले आहे. शहराचे वारंवार निर्जंतुकीकरणासाठी मदत केली. कोविड विलगीकरण केंद्रावर साफसफाई ठेवली. तसेच करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा अंत्यसंस्कार करण्याची मोठी जबाबदारी देखील पार पाडली. करोनाच्या महामारीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान मिळाल्याने त्यांचा सन्मान करणे उचित वाटल्याने या कामात त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून सत्कार केल्याचे मुख्याधिकारी गांगोडे यांनी नमूद केले आहे.