सध्या आयोध्येतील राम मंदिरासंदर्भात देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना राज्यातील शिवसेना-भाजपा युतीवर टिका केली होती. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढून समाजात धृवीकरण केलं जातं. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला होता. अजित पवारांच्या याच वक्तव्यावरून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमत चाचणी घेऊन पवार यांनी शिवसेना भाजपाबद्दल व्यक्त केलेले मत तुम्हाला पटते का असा सवाल वाचकांना केला होता. यामध्ये ६५ टक्के वाचकांनी होय असे मत नोंदवत अजित पावरांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. या जनमत चाचणीमध्ये २ हजार ३०० हून अधिक तर ट्विटरवर ३०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले.

फेसबुकवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ‘निवडणुका आल्यावर शिवसेना-भाजपाला राम आठवतो हे नेते अजित पवारांचे विधान पटते का?’ हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर एकूण २ हजार ३०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले त्यापैकी ६५ टक्के म्हणजेच १ हजार ४०० हून अधिक जणांनी होय असे उत्तर देत अजित पवारांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले तर ३५ टक्के म्हणजेच ८११ वाचकांनी नाही असे उत्तर देत अजित पवारांच्या मताशी अहसमत असल्याचे सांगितले.

याच प्रश्नासंदर्भात ट्विटवर ३०४ जणांनी आपले मत नोंदवले त्यापैकी ८० टक्के वाचकांनी होय असं म्हणत अजित पवारांची बाजू घेतली तर २० टक्के वाचकांनी पवारांच्या मताला विरोध दर्शवला. म्हणजेच २४० हून अधिक जणांनी होकारार्थी उत्तर दिले तर ६० जणांनी नकारात्मक उत्तर दिले.

पिंपरीमध्ये बोलताना अजित पवारांनी भाजपाकडून निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात असे वक्तव्य केले होते.