जिल्ह्य़ातील ७०३ पैकी ४३० रुग्ण तालुक्यात

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७०३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४३० सक्रिय रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९२८ नवीन रुग्ण आढळले असून त्यामध्ये पालघर तालुक्यातील ३४१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात पालघर तालुका हा करोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे.

पालघर जिल्ह्यात सध्या असलेल्या करोना रुग्णांपैकी डहाणू तालुक्यात ७३, जव्हार  ८०, मोखाडा ४२, वाडा  ४१, वसईच्या ग्रामीण भागात ३०, तलासरी  दोन, तर विक्रमगड तालुक्यात पाच रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४०६ वरून ७०३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या ३०८ वर पोहोचली असून गेल्या चोवीस तासांत एक मृत्यू नोंदवण्यात आला. जिल्ह्यातील सरासरी मृत्युदर १.८५ इतका असून बरा होण्याचा रुग्ण दर ९३.९४ टक्के इतका आहे.

गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात १३७ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकीच ७२ रुग्ण पालघर तालुक्यामधील आहेत. त्यासोबत जव्हार तालुक्यात ३५ व डहाणू तालुक्यातील २६ नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. गेल्या सात दिवसांत पालघर तालुक्यात अनुक्रमे ४४, ४४, १४, ६१, ५३, ५३ व ७२ अशी रुग्णवाढ नोंदविण्यात आली.

सद्य:स्थितीत रिवेरा रुग्णालयात ५८ रुग्णांवर उपचार सुरू असून टिमा रुग्णालयात २८, वाडा आयडियल रुग्णालय ३४, पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात ११, डहाणू कॉटेज रुग्णालयात आठ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. सध्या जव्हार येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर केंद्रांमध्ये ५६ रुग्ण दाखल असून ४९८ रुग्णांना घरी विलगीकरण करण्याची परवानगी देण्यात आले आहे.

वसईत २०० नवे करोना रुग्ण

वसई : मागील तीन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी वसईत २०० नवीन करोना रुग्ण आढळून आले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात शुक्रवारी २०० नवीन  करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२ हजार १२२  एवढी झाली आहे. मृतांची आकडेवारी ९१२ इतकी झाली आहे.

तसेच आज ५५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ९९५ वर गेली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्येत वाढ झाली असून अजूनही १ हजार २१५ रुग्ण उपचार घेत आहेत.

डहाणूत ३० जणांना संसर्ग

डहाणू: पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी वाढीस लागली असून  गुरुवारी एका दिवसात  डहाणू तालुक्यात ३० कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे डहाणूत करोना वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या स्थितीत ५२ एक्टीव रुग्ण आहेत. करोनामुळे आतापर्यंत  डहाणू तालुक्यात ४० मृत्यू झाले आहेत. प्रशासनाकडून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.