उस्मानाबाद शहरात करोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सोमवारी जिल्ह्यात दिवसभरात ७५ रूग्णांची भर पडल्याने आजवरच्या बाधितांची संख्या ७२९ वर पोहचली आहे. परिणामी नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे १७८ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ९६ स्वॅबचे अहवाल सोमवारी दिवसभरात प्राप्त झाले. यातील अनुक्रमे ५५ आणि २० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात १८,  उमरगा २३, तुळजापूर ९, कळंब ७, वाशी ७, परंडा २ तर लोहारा तालुक्यात १ रुग्ण आढळून आला. उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात संसर्गाचा वेग अधिक असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

एकाच दिवसात तब्बल ७५ कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण काळजी वाढविणारे आहे. सर्वसामान्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनाही कोरोनाची बाधा होत आहे. जुलै महिन्यात उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले होते. तथापि काही प्रमाणात संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येचा वेग वाढू लागल्याचे चित्र आहे.

२७ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या ७२९ वर पोहचली असून ४६५ जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर २२४ जणांवर उचार सुरू असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे.