राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रायगड जिल्ह्य़ातील ७९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या १२ वीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्य़ातून २४ हजार ७१० विद्यार्थी बसले होते. यापैकी ७९.६३ टक्के म्हणजे १९ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांंमध्ये मुलींचे प्रमाण ८५.५१ टक्के तर मुलांचे प्रमाण ७४.२२ टक्के आहे.     बारावीच्या परीक्षेत जिल्ह्य़ातील १० हजार १२३ मुली आणि ९ हजार ५५३ मुले उत्तीर्ण झाले आहेत. यात जिल्ह्य़ातील ६५६ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ४ हजार २६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार ५३० द्वितीय श्रेणीत तर ३२२९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.
 जिल्ह्य़ाचा विज्ञान शाखेचा निकाल ९०.४४ टक्के लागला, विज्ञान शाखेतून या परीक्षेसाठी ८ हजार ५१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ७ हजार ६९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्य़ाचा कला शाखेचा निकाल ६९.५१ टक्के लागला. कला शाखेतून ७ हजार ६९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ५ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील ७६.१९ टक्के विद्यार्थी या परीक्षेत पास झाले. वाणिज्य शाखेतील ७ हजार ६१९ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ८०५ विद्यार्थी पास झाले, तर किमान कौशल्य शाखेतील ९६.४१ टक्के विद्यार्थी पास झाले.  तालुका स्तरावरील निकालाचे वर्गीकरण केले तर जिल्ह्य़ात सर्वात चांगला निकाल सुधागड पाली तालुक्याचा लागला आहे. या तालुक्यातील ८५.६५ टक्के विद्यार्थी पास झालेत, तर सर्वात कमी निकाल हा खालापूर तालुक्याचा लागला आहे. या तालुक्यातील ६९.४९ टक्के विद्यार्थी पास झाले आहे.