वर्गामधे झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाणामारीत सातवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू ओढवला. तालुक्यातील राजापूर येथील एका शाळेत घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. प्रकरण मिटविण्यात यश न आल्याने अखेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पाच अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा नेंदविण्यात आला आहे.
किरण गोरक्ष सोनवणे (वय १३) असे मारामारीत मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी शाळकरी मुलाचे नाव आहे. ता सातवीत शिकत होता. गेल्या दि. २६ जुनला राजापूर येथील एका शाळेत मारामारीचा प्रकार घडला. किरण व त्याच्या वर्गमित्रांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. रागाच्या भरात वर्गातल्या अन्य पाच मुलांनी किरणला पकडत बेंचवर आपटले. एवढय़ावर न थांबता लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला वर्गाबाहेर ओढत नेत झाडावर जोराजोरात आपटले. शाळा सुटल्यावर किरण घरी गेला. त्यानंतर त्याचे डोके दुखायला लागले म्हणून संगमनेरातल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला नंतर नाशिकला उपचारांसाठी हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच दि. १ जुलैला त्याचे निधन झाले. तोपर्यंतही अनेकांना त्याची कल्पना नव्हती. मात्र मंगळवारी रात्री किरणची आई रोहिणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गोंधळ उडाला. संगमनेर शहर पोलिसांनी याबाबत किरणशी मारामारी केलेल्या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांंवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पुढील तपास करत आहेत. याबाबतचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.