उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हय़ातील सहा, तर धुळे जिल्हय़ातील साक्री या एकमेव नगर पंचायतीसाठी रविवारी सुमारे ८० टक्के मतदान झाले. राजकीय पक्षांची परीक्षा पाहणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात विशेष लक्ष दिले नव्हते; परंतु भाजपचे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह इतर काही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. मतमोजणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवळा येथे ७५ टक्के मतदान झाले. १७ जागांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जनशक्ती पॅनलचे सहा उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उर्वरित सर्व उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर रिंगणात आहेत. निफाडमध्ये मतदानाची टक्केवारी थेट ८२ पर्यंत पोहोचली. येथे १७ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात असून त्यात ५३ उमेदवार राजकीय पक्षांचे, तर १३ अपक्ष उमेदवारांना पक्षांनी पुरस्कृत केले आहेत. एकेका मताला ‘किंमत’ मोजण्यात आल्याची येथे चर्चा आहे. राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सुरगाणा येथे ८० टक्के मतदान झाले. १७ जागांसाठी ५८ उमेदवार मैदानात असून सुरगाणा हा माकपचा बालेकिल्ला मानला जातो. पेठमध्ये ८०.२४ टक्के मतदानाची टक्केवारी राहिली. १७ जागांसाठी ६१ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे. शिवसेनेने सर्वाधिक १५, तर राष्ट्रवादीने १४ उमेदवार उभे केले आहेत. इतर पक्षांमध्ये काँग्रेस ११, भाजप ९, माकप ३, मनसे ४ आणि अपक्ष १३ यांचा समावेश आहे. चांदवडमध्ये ८०.१२ टक्के मतदान झाले. १७ जागांसाठी ११६ उमेदवारांमध्ये रस्सीखेच आहे. विशेष म्हणजे त्यात ५८ अपक्ष उमेदवार असून भाजपने येथे चांगलाच जोर लावला आहे. धुळे जिल्हय़ातील एकमेव साक्री नगर पंचायतीसाठी ६९ टक्के मतदान झाले. १७ जागांसाठी ४५ उमेदवार मैदानात असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांच्यात येथे थेट लढत आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींच्या पाश्र्वभूमीवर येथे हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने या निवडणुकीस महत्त्व आले आहे. सर्वत्र शांततेत मतदान झाले.