वसई-विरारमधील ८२ टक्के रुग्ण करोनामुक्त

वसई : वसई-विरार शहरातील करोनाबाधितांच्या संख्येने १५ हजारांचा टप्पा पार केला असला तरी शहरातील करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत वसई-शहर आणि ग्रामीण भागांतील ८२ टक्के रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

वसई-विरार शहरात १३ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली होती.मध्यंतरी दिवसाला सरासरी ३०० करोनाचे रुग्ण आढळून येत होते. परंतु ऑगस्ट महिन्यापासून ही आकडेवारी हळूहळू कमी होऊन करोनामुक्त होण्यात वाढ झाली आहे. दिवसाला सरासरी २०० ते २५० रुग्ण करोनामुक्त होऊ  लागले आहेत.

वसईतील करोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. जे करोनाबाधित आहेत त्यांच्यावर पालिकेच्या विलगीकरण कक्षात उपचार करण्यात आले. यामुळे हळूहळू वसईतील करोनारुग्णांची संख्या कमी होऊ  लागली आहे. सद्य:स्थितीत शहरी व ग्रामीण मिळून करोनाबाधित रुग्णांचा आकडा १५ हजार ५९५ झाला

आहे. त्यातील १२ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच ८२ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर सध्या शहरात २ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मृत्यूचे प्रमाण दोन टक्के

वसई-विरार शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या जरी झपाटय़ाने वाढत असली त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २.१४ टक्के आहे. वसईत शहरी भागात ३१३ व ग्रामीणमध्ये २१ असे एकूण ३३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गंभीर स्वरूपाचे आजार आणि ५० वर्षांवरील नागरिकांचा मृत्यू झाला आहे.