रायगड जिल्हय़ात ४२ जण मृत्युमुखी
कोकणात उन्हाळी सुटीच्या हंगामात पर्यटकांच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले असून, यंदा एप्रिल व मे या दोन महिन्यांत महामार्गासह विविध रस्त्यांवरील वाहन अपघातांमध्ये तब्बल ९३ जणांचा मृत्यू ओढवला आहे.
सुटीच्या काळात पर्यटनाला जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून, कौटुंबिक पर्यटनासाठी अनेक जण कोकणाला पसंती देतात. त्यामुळे स्वाभाविकपणे या परिसरात या काळात वाहनांची वर्दळही मोठय़ा प्रमाणात असते. त्यातूनच अपघातांचे प्रमाणही वाढते, असा अनुभव आहे. यंदाचा उन्हाळी हंगामही त्याला अपवाद ठरलेला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, या विभागातील तीन जिल्हय़ांपैकी रायगड जिल्हय़ात या दोन महिन्यांत मिळून रस्त्यांवरील १२७ अपघातांमध्ये ४२ जण मृत्युमुखी पडले, तर ९० जण गंभीर जखमी झाले आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात गेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये मिळून रत्नागिरी-कोल्हापूर व मुंबई-गोवा या दोन राष्ट्रीय महामार्गासह विविध रस्त्यांवरील वाहन अपघातांमध्ये एकूण ४९ जण प्राणास मुकले आहेत. त्यामध्ये ३९ पुरुष व १० महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांची संख्या १३९ आहे. यापैकी एप्रिल महिन्यातील अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १२ जण महामार्गावरील अपघाताचे बळी आहेत. मे महिन्यात या संख्येमध्ये आणखी सुमारे ३३ टक्के वाढ होऊन एकूण ३० जणांचा अपघाती मृत्यू ओढवला आहे. त्यापैकी २३ मृत्यू महामार्गावरील अपघातांमध्ये झाले आहेत. राज्य व राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त जिल्हय़ातील अंतर्गत रस्त्यांवर या दोन महिन्यांच्या काळात झालेल्या अपघातांमध्ये एकूण १४ जण मृत्युमुखी पडले असून, ४२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दोन जिल्हय़ांच्या तुलनेत सिंधुदुर्गात उन्हाळ्याच्या हंगामात अपघातांचे प्रमाण पुष्कळ कमी राहिले आहे. या जिल्हय़ात एप्रिलमध्ये झालेल्या १५ अपघातांमध्ये मिळून दोन जण ठार झाले, तर मे महिन्यात ३३ रस्ते अपघात झाले, पण कोणीही दगावले नाही. मात्र, त्यापूर्वी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात जिल्हय़ात तब्बल २५ जणांचा अपघाती मृत्यू ओढवला.
गणपती, शिमगाही धोकादायक
उन्हाळी सुट्टीप्रमाणेच कोकणात गणपती किंवा शिमग्याच्या काळातही रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढते, असा अनुभव आहे. याचे मुख्य कारण बाहेरगावांहून येणारे वाहनचालक येथील अवघड किंवा अचानक वळण घेणाऱ्या रस्त्यांना सरावलेले नसतात. त्यामुळे अशा वळणांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटून किंवा समोरून आलेल्या वाहनांशी धडक होऊन अपघात होतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याचप्रमाणे हौशी, अननुभवी वाहनचालक किंवा खासगी प्रवासी गाडय़ांवरील पुरेशी विश्रांती न झाल्याने डुलकी येणारे वाहनचालकही अशा अपघातांचे कारण ठरत असतात. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर हे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.