16 October 2019

News Flash

मुलीसाठी कायपण ! कोल्हापुरात चक्क बैलगाड्यांमधून निघाले व्हराड

मुलीला घोड्यावर बसवुन वाजत-गाजत, दिमाखात लग्नाचे व्हराड विवाहस्थळाकडे नेण्यात आले

‘हौसेला मोल नसते’ याचा प्रत्यय नुकताच कोल्हापूर जिल्ह्यात आला. एकुलत्या एका मुलीच्या विवाहासाठी आलेल्या व्हराडी मंडळींचे स्वागत चक्क बैलगाड्यांमधून करण्यात आले. आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न अगदी थाटामाटात आणि वेगळ्या पद्धतीने व्हावं यासाठी मुलीच्या वडिलांनी ही शक्कल लढवली.

हल्ली खेडोपाड्यातही मोटारींचे प्रस्थ वाढले आहे. विवाहासाठी तर खेड्यातही आलिशान मोटारी पाचारण केल्या जातात. वाढू- वरांसाठी सजवलेल्या मोटारी विवाहाची शोभा वाढवत असतात. मोटारी आल्या तसतसे बैलगाड्यांचे महत्व उतरणीला लागले. अन्यथा, पुर्वी लग्नाचे वऱ्हाड हे बैलगाडीतून प्रवास करीत असे. गावगाड्यात बैलही कमी होऊ लागले आहेत. अशा या बदलत्या वातावरणात विवाहासाठी आलेल्या व्हराडी मंडळींचे स्वागत चक्क बैलगाड्यांतुन होणे म्हणजे अप्रूपच ठरले. पन्हाळा तालुक्यात अशाप्रकारे झालेले एक लग्न लक्षवेधी ठरले आहे.

पोरीचं लग्न वेगळ्या प्रकारे झाले पाहिजे आणि ते सर्वांच्या लक्षातही राहिले पाहिजे अशी इच्छा कोलोली गावातील मारुती श्रीपती जाधव यांची होती. एकुलती एक मुलगी तृप्ती जाधव हिचा विवाह गावातीलच विजय पांडुरंग पाटील या मुलाशी ठरला होता. लग्नासाठी व्हराड घेऊन जाण्यासाठी जाधव यांनी नामी शक्कल लढवली.

मुळात शेतकरी असल्याने त्यांनी जुन्या काळाप्रमाणे मुलीचे व्हराड बैलगाडीतूनच घेऊन जायचे ठरवले. तशी जुळवाजुळव सुरु केली. एक-दोन करता करता त्यांनी गावातील ३० हुन अधिक बैलगाड्या जमवल्या. बैलांसह बैलगाड्या आकर्षकरित्या सजवण्यात आल्या. फेटे बांधलेली पाहुणे मंडळी या बैलगाड्यात अगदी मजेत बसली. शहरी पाहुणे तर या अनोख्या पद्धतीने हरखून गेली. मुलीला घोड्यावर बसवुन वाजत-गाजत, दिमाखात लग्नाचे व्हराड विवाहस्थळाकडे नेले. आजची तरुणाई हा आगळा प्रसंग मोबाईलमध्ये चित्रित करण्यात मग्न होती.

समाज माध्यमातून याची चित्रफीत दिसल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी नव्या-जुन्याचा मिलाफ घडवणाऱ्या या आगळ्या विवाहाला चांगलाच प्रतिसाद दिला. जाधव यांच्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी सुद्धा भरभरून कौतुक केले. मुलीचे लग्न नेहमी लक्षात राहावे, ही त्यांची इच्छा फलद्रुप झाल्याचा आनंद चेहऱ्यावर तरळत होता.

First Published on May 16, 2019 7:43 pm

Web Title: a father organise bullock cart ride for guest in daughter marriage in kolhapur