ब्रह्मपूर्ण योजनेचा आधार
मार्केट यार्डात शेतीमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतक ऱ्यांसाठी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ‘ब्रह्मपूर्ण योजना’ सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात या योजनेचा लाभ सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी घेतला आहे. वार्षिक उलाढाल सुमारे ९५० कोटींच्या पुढे असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची विक्री करण्यासाठी दररोज सुमारे पाच हजार शेतकरी येतात. यात उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर आदी दूरच्या अंतरावरील शेतकऱ्यांचे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीशी नाते आहे. शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातूनही शेतकरी येतात. या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात बऱ्याचवेळा दोन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यांच्या निवासाची सोय बाजार समितीत आहे. परंतु जेवणासाठी बाहेरच्या हॉटेलांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे एकावेळचे जेवण घेण्यासाठी किमान ५० ते ६० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. काही गरीब शेतकरी दोन ते तीन दिवसांसाठी मुक्कामासाठी येताना घरातून सोबत भाकरी बांधून येतात. परंतु त्यांना भाकरीसोबत जेवणासाठी भाजी हॉटेलातून घ्यावीच लागते. त्यासाठी किमान २५ ते ३० रुपये मोजावे लागतात. गोरगरीब शेतकऱ्यांना जेवणाचा हा खर्च परवडत नाही. त्यातूनच अशा शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत नाममात्र दरात पोटभर जेवण देण्याची योजना सुरू करण्याचा विचार पुढे आला.
बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी सभापतिपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर अनेक योजना कृतीत आणल्या आहेत. त्यापैकीच शेतकऱ्यांसाठी ‘ब्रह्मपूर्ण योजना’ ही शेतकऱ्यांना दोनवेळचे जेवण अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी असली तरी त्यात बाजार समितीसह तेथील आडत व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पोटभर जेवणाच्या एका ताटासाठी साधारण ३० रुपये खर्च येतो. त्यापैकी २० रुपये बाजार समिती देत आहे, तर उर्वरित १० रुपये आडते देत आहेत. दररोज शंभरपेक्षा अधिक शेतकरी ब्रह्मपूर्ण योजनेचा लाभ घेऊन तृप्त होत आहेत. जेवणात तीन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, भात व कोशिंबिर यांचा समावेश आहे.