ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही येथे एका सहकारी राईस मिलमध्ये ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग यांना सकाळी साडेसातच्या सुमारास सिंदेवाहीच्या राईस मिलमध्ये वाघीण ठाण मांडून बसल्याची माहिती मिळाली, त्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत वाघाने मिलच्या एका कर्मचाऱ्याला जखमी केले होते. त्यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने बरेच परिश्रम केले. पण ही वाघिण त्यांना चकवा देत होती.

दरम्यान, ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना पाचारण करण्यात आले. तिथे जाळी लावून वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. बरेच प्रयत्न केल्यानंतर अजय मराठे यांनी भूलीचे इंजेक्शन वाघिणीला टोचले. त्यानंतर वाघीण बेशुद्ध झाली, त्यानंतर तिला जेरबंद केले गेले.

जेरबंद वाघीण अडीच ते तीन वर्षाची आहे. तिचे आरोग्य पण चांगले आहे. ब्रम्हपुरीच्या सहाय्यक वनरक्षक रामेश्वरी भोंगाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोड, घनश्याम नायगावकर, महेश गायकवाड, धनविजय, अमोल ताजणे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे बजावली.