पिंपरी चिंचवडच्या चोवीसावाडी येथे ड्रेनेजचे काम सुरू असताना खड्ड्यात अडकून एका मजुराचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अद्याप जखमी आणि मयत मजुराचे नाव समजू शकले नाही. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चोवीसावाडी येथे घडली आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चोवीसावाडी परिसरात ड्रेनेज आणि रस्त्याचे काम सुरू आहे. ड्रेनेजचे काम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यातील माती काढून शेजारी टाकण्यात आली. दोन मजूर ड्रेनेजच्या आत उतरले होते. मात्र पाऊस सुरू असल्याने माती सैल होत चालली होती. अचानक माती ड्रेनेजमध्ये गेली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दोघ मजूर अडकले. या घटनेत एका मजुराचा गुदमरून मृत्यू झाला तर दुसऱ्या मजूराला तात्काळ बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही ही मजूर हे परप्रांतीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप दोघांचे नाव समजू शकले नाही.