दिल्लीत आम आदमी पक्ष बहुमत सिद्ध करत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये या पक्षात अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या विजय पांढरे यांच्यावर पक्षाचे जिल्हा संयोजक डॉ. गिरधर पाटील यांनी टीकास्र सोडले आहे. काही जुने समाजवादी भंगार पक्षात शिरल्याने त्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. पक्षात चळवळीतून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अण्णांचे कार्यकर्ते म्हणून लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील आपमध्ये दोन गट पडले असून त्यातील एका गटाने गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यामुळे संतापलेल्या दुसऱ्या गटाने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार केवळ दिल्ली कार्यालयालाच असून स्वयंघोषित नेमणुका करवून घेतलेल्या अस्थायी कार्यकर्त्यांना नाही, असा टोला लगावला आहे. चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांना अण्णांचे समर्थक म्हणून हिणवत खच्चीकरण केले जात आहे. मेणबत्ती पेटवून वा टोप्या घालून नाशिकसारख्या शहरात पोराटोरांचे राजकारण चालणार नाही अशा रीतीने आपले कार्य सुरू होते. आजही आपची शेतकरी व ग्रामीण भागाबद्दल निश्चित अशी भूमिका नाही. लाट आहे म्हणून आपोआप मते मिळतील या भ्रमात शेवटी ते मिळालेली संधी गमावतील आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवतील अशी परिस्थिती आहे, याकडे डॉ. पाटील यांनी लक्ष वेधले.
या पोराटोरांमध्ये विजय पांढरेसारखा सरकारी कर्मचारी आपली जागा शोधतो आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता येथील उद्योजक, व्यापारी, शेतकरी व कामगार यांचा विचार करता एक प्रगल्भ व अभ्यासू नेतृत्वाची गरज होती. सिंचन घोटाळा मुख्यमंत्र्यांनी कॅगच्या अहवालावर टिप्पणी करताना शोधून काढला होता. त्यावेळी जबाबदारीचे पद सांभाळणारे पांढरे हे अधिकारी सोडा तर शिपायावरही कारवाई करू शकले नाहीत.
आपली नोकरी जाऊ नये म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. त्यांचे सारे शहाणपण निवृत्तीनंतर, तेही सारे फायदे पदरात पडल्यानंतर. ३० तारखेच्या आत आपला पक्षप्रवेश जाहीर करू नका असे ते सातत्याने बजावत होते. कारण हे शासकीय फायदे पदरात पडणार नाही अशी पांढरेंना भीती वाटत होती, असा गौप्यस्फोट डॉ. पाटील यांनी केला.