23 March 2019

News Flash

दैव देतं आणि कर्म नेतं ! नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक  

दीड हजाराची लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आणि रवानगी झाली ती थेट कारागृहात

एखाद्या गोष्टीचा मोह करणे किती महाग पडू शकते याचा प्रत्यय कोल्हापुरातील एका घटनेमुळे समोर आला आहे. वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांचा कामावरील आज शेवटचा दिवस होता. दोन तासानंतर तो निवृत्त होणार होता. पण या काळातही लाच घेण्याचा मोह काही त्याला आवरला नाही. दीड हजाराची लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आणि रवानगी झाली ती थेट कारागृहात.

शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीने लेखापाल सदाशिव याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी – विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एका महिलेने त्यांची जमीन विक्री करण्यासाठी विचारणा केली होती. जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सेटिव्ह झोन) समाविष्ट होते का, हे तपासून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी येथील वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांच्याशी संपर्क साधला.

सातपुते याने या कामासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक कार्यालयात सापळा लावला होता. लेखापाल सातपुते हा तडजोडीअंती दीड हजाराची लाच घेताना पकडला गेला. पंचासमक्ष लाचेची रक्कम वसूल करण्यात आली. विशेष म्हणजे,  सातपुते हे सेवाकाळात अखेरचा दिवस कार्यालयात व्यतीत करत असताना या कृत्यात पकडला गेला, असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

First Published on May 31, 2018 9:24 pm

Web Title: acb arrest forest employee while taking bribe