भरधाव मालमोटारीची जीपला व नंतर अ‍ॅटोरिक्षाला धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात नऊ जण ठार झाले. नांदेड जिल्ह्य़ातील मालेगाव-अर्धापूर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये तीन महिला व बालकांचा समावेश आहे. अपघातातील जखमी सोळापैकी सहाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
उमरी तालुक्यातील तळेगाव येथील पांचाळ कुटुंबीय औंढा तालुक्यात बोरजा येथे एका महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. त्यांच्या रिक्षामध्ये तब्बल १२ जण होते. मालेगाव-अर्धापूर रस्त्यावर भरधाव मालमोटारीने सुरुवातीला बोलेरो जीपला धडक दिली.  
जीप एका बाजूला पडल्यानंतर हीच मालमोटार अ‍ॅटोरिक्षावर आदळली. त्यानंतर मोटारसायकललाही उडवले. अपघातात तीन महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. परभणी येथील दोन बालकांचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
मारोती शंकर पांचाळ (४५, तळेगाव), तब्बसुम बेगम शे. मजहर (३०, परभणी), लालू उडतेवार व शोभा लालू उडतेवार (तळेगाव) यांचा जागीच, तर अयाद मजहर (८) व सुफीयान मजहर या भावंडांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांची ओळख सायंकाळपर्यंत पटू शकली नव्हती. सहा मृतांचे शवविच्छेदन मालेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
अपघातात शोभाताई मारोतराव पांचाळ ( ३५), प्रल्हाद किशन पांचाळ (४०), सुधाकर कंधारे (४०), अनुसया गंदपवाड (४५), मधुकर गोल्लेवार (३०), माधव पांचाळ (४०), शारदाबाई पांचाळ (५०, रा.तळेगाव, ता. उमरी), भुंजाजी सखाराम राजेगोरे (६५, शेळगाव), मुशब्बीर मुनीर (५०, अर्धापूर), अब्दुल रहीम शेख रब्बानी (२२, अर्धापूर), आवेद मजहर ( १२, परभणी) हे जखमी झाले.
तीन जखमींची ओळख उशिरापर्यंत पटू शकली नाही. जखमींपैकी सहाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.