उद्योजकांकडून हप्ते मिळत असल्यानेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी कुंभेफळ व लाडगाव येथील दूषित पाण्याकडे कानाडोळा करतात, असा आरोप येथील गावकऱ्यांनी गुरुवारी जनसुनावणीत केला. पिण्याचे पाणी एवढे खराब झाले आहे की, जनावरेही त्याला तोंड लावत नाहीत. रॉडिको व हर्मन या दोन कंपन्यांतून होणाऱ्या प्रदूषणामुळे जगणेच अवघड झाल्याची कैफियत त्रस्त नागरिकांनी मांडली. त्यावर कोणतेही उत्तर न देता वेळ मारून नेण्यातच अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.
नवी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात येणारे उद्योग, त्यातून निर्माण होणारे पर्यावरणाचे प्रश्न कसे हाताळले जातील, या उद्योगाच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत घेण्यात आलेल्या या सुनावणीस अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लावंडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी, ए. एन. काटोले, उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात, डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी आदी उपस्थित होते.
नव्या प्रकल्पातील पर्यावरण समस्यांवर फारसे न बोलता गावकऱ्यांनी कंपन्यांकडून सध्या सुरू असणाऱ्या प्रदूषणाचे भीषण वास्तव अधिकाऱ्यांसमोर मांडले. लाडगावचे सरपंच रामराव शेळके म्हणाले की, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणामुळे एकाही कूपनलिकेचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे या भागात नव्याने रासायनिक कंपन्यांना गुंतवणूक करण्यास परवानगी देऊ नये. करमाडचे दत्ता उकिरडे यांनी रॉडिको कंपनीमुळे गावातील पाणी लाल रंगाचे झाले आहे, असा आरोप केला, तर कुंभेफळचे सुधीर मुळे यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली, असा सवाल केला.
काही नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळात थेट हप्तेखोरी चालते. कारवाई काहीच होत नाही, असाही आरोप या वेळी केला. ज्या गावांत पाणी प्रदूषित होते, तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. शेंद्राबनचे सरपंच संजय पाटोळे यांनी पिण्याचे पाणी म्हणजे विषच बनले असल्याची तक्रार केली. प्रत्येकजण उठायचा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी लक्षच देत नसल्याचा आरोप करायचा. त्यामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांमुळे किती प्रदूषण होईल, त्यावर कोणती उपाययोजना केली जाईल, अशा प्रश्नांवर फारशी चर्चाच झाली नाही.
दिल्ली-मुंबई ओद्योगिक पट्टय़ातील ही माहिती देण्यासाठी नेमलेल्या सल्लागार सुनीता सहस्रबुद्धे यांनी प्रश्न सध्या अस्तित्वातील कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा असल्याचे सांगितले. मात्र, चर्चा वाढू नये म्हणून प्रदूषण मंडळाचे जोशी यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे सांगत वेळ मारून नेली. सुनावणीतील या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत दिलीच नाहीत.
‘तक्रार होताच कारवाई’
दुग्रेश जैस्वाल, भाऊसाहेब मुळे, भाऊसाहेब घाडगे, अमरसिंह देशमुख यांच्यासह अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. मात्र, प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांची उत्तरे दिली नाहीत. या आरोपांच्या अनुषंगाने ‘आरोपात तथ्य नाही. तक्रार होताच कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करण्यात आली. काही कंपन्यांची बँक गॅरंटीही जप्त केली होती,’ असे जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.