जिल्हा परिषदेकडून माहिती; चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

पालघर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागांच्या संख्येमध्ये फेरबदल करून त्याच्या आधारे चुकीच्या पद्धतीने एकूण ४९ उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर नोकरीमध्ये समावून घेण्यात आले होते. याप्रकरणातील दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणीतील चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून अंतिम अहवाल आल्यानंतर कारवाईस सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होण्यापूर्वी रिक्त व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करून त्याआधारे अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती करण्यात आली होती. असे करताना ज्येष्ठता यादीची पूर्तता न करता अनेक होतकरू उमेदवारांना डावलून भरती झाल्याचे निष्पन्न झाले होते. अनुकंपा तत्त्वावर झालेल्या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचे सदस्यांनी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत मांडल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली. नंतर याप्रकरणी अनियमितता झाल्याचे जिल्हा परिषदेने मान्य करून काही उमेदवारांना नोटीसा पाठवल्या होत्या.  यामुळे बाधित होणाऱ्या उमेदवारांनी आपण काही कर्मचाऱ्यांना लाखो रुपये भरतीसाठी दिल्याचे खासगीत सांगत असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी व काही कर्मचारी सहभागी असल्याचे आरोप करण्यात येत होते. या सर्व प्रकरणी जिल्हा परिषदेने समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवला होता. शासनाकडून चौकशी पूर्ण करण्यात आली असून कारवाई करण्यासाठी अंतिम अहवाल येणे अपेक्षित आहे.

शासनाकडून अंतिम अहवाल

जिल्हा परिषद अनुकंपा गैरप्रकारामध्ये चौकशी समिती तयार करण्यात आली होती. या समितीचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी शासनाकडून अंतिम अहवाल येणे अपेक्षित असून या प्रकरणी सर्व दोषींविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी या विषयी विचारणा केली असता सांगितले.