आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. येत्या १ जुलैपासून ते १६ ऑगस्टपर्यंत मतदारसंघात पन्नास सभा घेऊन ‘व्होट भी दो, नोट भी दो’ असे आवाहन करीत २५ लाखांचा निवडणूक निधी जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील २००९ साली सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आडम मास्तर हे काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभूत झाले होते. या अगोदर १९७८ साली सोलापूर शहर उत्तरमधून व नंतर १९९५ साली तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून आडम मास्तर हे दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आगामी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना आडम मास्तर म्हणाले, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पक्ष कार्यकर्ते व सहानुभूतीदार व हितचिंतकांच्या बैठकांचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ गेल्या २८ मे रोजी झाला असून येत्या ३० जूनपर्यंत सोलापूर शहर मध्य विधानसभा  मतदारसंघात ५३ शाखांमधून प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. यात प्रजा नाटय़मंडळाच्या कला पथकाचाही सहयोग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात, केंद्रात व सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतानासुद्धा सत्ताधाऱ्यांनी सोलापुरात ‘साहेब’ संस्कृती रुजविली आहे. प्रत्यक्षात सोलापूर शहराची अवस्था भकास झाली आहे. शहराचा विकास झाला, अशा केवळ वल्गना केल्या जात असताना सामान्य जनता आता जागृत झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ही लोकजागृती दिसून आली असून त्याचा प्रत्यय आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही आडम मास्तर यांनी व्यक्त केला. आपण मतदारसंघात सर्वसामान्य घटकांसाठी काम उभे केले असून सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला, याची जाणीव समस्त मतदारांना आहे. त्याचा निश्चित लाभ मिळेल, असा दावाही त्यांनी केला. आपण विधानसभा निवडणुकीत निवडून आलो, तर प्राधान्याने शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी यंत्रणेला भाग पाडू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी माकपचे जिल्हा सचिव प्रा. एम. एच. शेख, नसीमा शेख, नगरसेविका सुनंदा बल्ला, नलिनी कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी आदी उपस्थित होते.