युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी रोड शो करून शिवसैनिकांची मने जिंकली. ठाकरे यांना पाहाण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी तसेच साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात महायुतीचे सरकार येवो, असे साकडे त्यांनी साईबाबांना घातले.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तास उशिराने शिर्डीत दाखल झाले. ठाकरे यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे,  नाशिकचे संपर्कप्रमुख आ. रवींद्र मिर्लेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राहाता तालुकाप्रमुख कमलाकर कोते, शिर्डीचे नगरसेवक अभय शेळके, भाजुमोचे सचिन तांबे, गजानन शेर्वेकर आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांचे शिर्डीत दुपारी पावणेतीन वाजता आगमन झाले. समाधी  मंदिर परिसरात प्रवेश करताच त्यांनी भाविकांकडे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करीत अभिवादन केले. साईंच्या दर्शनानंतर पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नावर बोलण्याचे टाळत त्यांनी आपण केवळ साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असून, शिर्डी, नाशिक व राज्यात शिवसेनेचे खासदार निवडून आले हा सत्याचा विजय असल्याचे सांगत, देशात चांगले सरकार आले असून महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येवो असे साकडे आपण साईबाबांना घातल्याचे व राज्याची ईडापीडा टळो, चांगली पर्जन्यवृष्टी होवो, यासाठीही आपण प्रार्थना केली, असे त्यांनी सांगितले. या वेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी समाधी मंदिर परिसर दणाणून गेला.
दर्शनानंतर खा. लोखंडे यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उदघाटन ठाकरे यांनी केले. समाधी मंदिर ते संपर्क कार्यालयाकडे जाताना त्यांनी रोड शो केला.