‘मी येतोय सिंधुदुर्गात’ या आशयाचे बॅनर्स झळकवत शिवसेनेचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गात रोड शो केला. ‘आता कोकण काबीज’ आशयाचे शिवसेना स्टाइल बॅनर्स आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या चर्चेचे बनले. जिल्ह्य़ात त्यांचे भव्य स्वागत करताना रॅलीही काढण्यात आली.
शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गोवा राज्यातून सिंधुदुर्गात सकाळी प्रवेश केला. मलपे, सातार्डा, मळेवाड, शिरोडा, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली, खारेपाटण या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कुडाळ व कणकवली या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधत काँग्रेसवर टीका करतानाच नारायण राणे यांचे नाव टाळत प्रहार केला.
महाराष्ट्रात काँग्रेस कुठे आहे, असा प्रश्न करत अडविण्याची धमकी कोणी देऊ नये असा इशारा दिला. युतीची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केला जाईल, असे सांगत काँग्रेसवर टीका केली. नारायण राणे यांच्यावरही त्यांनी टीका करताना नाव घेण्याचे टाळले.
शिवसेना स्टाइल रोड शो कसा असावा, त्याचा प्रत्यय नव्या दमाच्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात दिसला. पोलीस, खासगी सुरक्षारक्षक व शिवसैनिकांच्या भक्कम सुरक्षा कवचात आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला. त्यामुळे शिवसेनेचे नव्या दमाचे नेतृत्व सिंधुदुर्गवासीयांनी आज पाहिले.
यावेळी शिवसेना सचिव आ. विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुहास पाटकर, शैलेश परब, माजी महापौर दत्ता दळवी, तसेच आमदार, खासदार, शिवसेना नेते, पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते. शेकडो वाहने या दौऱ्याच्या ताफ्यात सहभागी झाल्याने सुरक्षायंत्रणेचे नियोजन फिसकटले होते.