१,३१२ मतदान केंद्रांवर मतदान; ७,२२१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पालघर :  पालघर जिल्हा परिषदेच्या ५४ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर २०१९ रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत एकूण १,३१२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून बुधवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेतला असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार आणि कर्मचारी : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या १० लाख ४४ हजार ८८८ आहे. त्यात ५,३०,६२१ पुरुष, ५,१४,२२८ महिला आणि ३९ इतर आहेत. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचारी अशा एकूण ७,२२१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २६ डिसेंबर २०१९ पासून निवडणूक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. मतदानासाठी एकूण २,२८४ बॅलेट युनिट तर १,८५३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मतदार पावतीचे वितरण

या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार पावती पोहोचवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असून येत्या रविवापर्यंत (५ जानेवारी) मतदारांना त्यांचे मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक मिळणार आहे.

मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे

  • तलासरी-तहसील कार्यालय
  •  डहाणू- सेंट मेरीज हायस्कूल, मसोली
  • विक्रमगड- पंचायत समिती सभागृह
  • जव्हार- आदिवासी भवन
  • मोखाडा- क्रांतिवीर राघोजी भांगरे सभागृह, पंचायत समिती, मोखाडा
  •  वाडा- पी.जे. हायस्कूल
  • पालघर- टिमा हॉल, बोईसर
  •  वसई- तहसील कार्यालय सभागृह

व्हीव्हीपॅट यंत्र नाही

या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम यंत्रांचा वापर होणार असून त्यासोबत व्हीव्हीपॅट यंत्र नसेल. ईसीआयएल कंपनीचे हे यंत्र असून ते अत्याधुनिक आहे. १,३१२ मतदान केंद्रासाठी १८५० ईव्हीएम यंत्र वितरित करण्यात येणार आहेत.