साताऱ्यात प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याचा फायदा उचलत शनिवार-रविवारी महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर, महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यावरील भोसे खिंडीत असणार्‍या मॅप्रो गार्डनमध्ये पुणे-मुंबईसह सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी करोना नियमांचे उल्लंघन करत, मोठी गर्दी केल्याने मॅप्रो कंपनीवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मागील आठवड्यात प्रशासनाने टाळेबंदीत शिथिलता आणून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार्‍या दुकानांना व विक्रेत्यांना सोमवार ते शुक्रवार काहीशी सूट दिली आहे. तर, शनिवार व रविवार कडक टाळेबंदी जाहीर करुन जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. दरम्यान, रविवार (१३ जून) रोजी सातारा जिल्ह्यात कडक टाळेबंदी असताना महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यावरील भोसे खिंडीत असणार्‍या मॅप्रो गार्डनमध्ये पुणे-मुंबईसह सातारा जिल्ह्यातील पर्यटकांची अक्षरश: झुंबड दिसून आली. शनिवार, रविवार आठवडी टाळेबंदी असताना महाबळेश्‍वरमध्ये एवढ्या मोठ्यासंख्येने पर्यटक आलेच कसे? सर्व हॉटेल रेस्टॉरंट पर्यटन बंद असताना पर्यटक आल्याने व या कंपनीने त्यांना सेवा दिल्याने याबाबतची तक्रार तहसीलदार सुषमा पाटील यांच्याकडे स्थानिकांनी केली होती. यावरून या तक्रारीची दखल घेत संबंधित कंपनी व्यवस्थापनास समज देत, पाच हजार रुपयाचा दंड वसूल केला गेला.

शासनाचे नियम पाळून शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी लॉकडाउनमध्ये देखील व्यवसाय सुरू ठेवला आहे. अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांना तालुका प्रशासन अद्दल घडवणार की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्‍ह्यात आठवडी टाळेबंदी जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. महाबळेश्वर-तापोळा रस्ता, महाबळेश्वर-प्रतापगड, महाबळेश्वर-केळघर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉज आहेत. तर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना हॉटेल व्यवसाय केला जात असल्याचेही दिसून आले आहे.

दरम्यान, महाबळेश्वर- पाचगणी रस्ता, भिलार, भौसे, नंदनवन कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुक्कामी आलेले होते. हे सर्व पर्यटक रविवारी फिरण्यास बाहेर पडले. मात्र या पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये कडक बंदमुळे काही खरेदी करता आली नाही. परंतु, गुरेघर येथे मॅप्रो कंपनीने व्यवसाय सुरू ठेवल्याने पर्यटकांनी मग तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. या संबंधी तक्रार आल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मॅप्रो कंपनीस पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.